1.माय मराठी (गाणे) | 5वी, मराठी ,कविता

1.माय मराठी(गाणे)

5वी, मराठी ,कविता

माय मराठी ! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले. कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई,
मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.
तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.
माय मराठी! तुझिया अंकी लोळण घेते, बागडते,
तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते.
 तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी,
जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची,
अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.
माय मराठी ! तुझियासाठी वात होउनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.

गाण्याचा अर्थ-

हे माय मराठी! माझे तनमनधन मी तुझ्या पायाशी समर्पित केले आहे. तुझ्या ठायी, तुझ्या नावामध्ये मी अखंड रंगले आहे. हे आई! कष्टामधली तुझ्याच अन्नामधली गोडी मला चाखायची आहे. मला तुझ्या आश्रयाला राहायचे आहे. तू गायिलेल्या अंगाईने तुझ्या मांडीवर मला निजायचे आहे.
हे माय मराठी ! तुझे झरे, तुझी पाखरे, तुझा सहवास, तुझी माणसे मला हवीहवीशी वाटतात. तुझा राग आणि प्रेम दोन्हीही मला हवेहवेसे आहेत.
हे माझे आई! मी तुझ्या मांडीवर खेळते, बागडते. तुझ्या आभाळात हळूच संचार करणे मला आवडते.
तुझ्या चालण्याची तुझ्या बोलण्याची पद्धत मला दाखव. जे पोटात असते, तेच ओठात येते, असले तुझे प्रेम मला शिकव. मी तुझ्यासाठी चांगल्या अर्थाची, लाजऱ्या गंधाची, नवलाईच्या रंगाची व मधुर शब्दांची माला गुंफीत बसते.
हे माय मराठी ! मी तुझ्यासाठी ज्योत होऊन जळते आहे. क्षणाक्षणाने व कणाकणाने तुझ्यामध्ये मी विलीन होते.

शब्दार्थ-

माय – आई.
तन- शरीर.
वाहियले- अर्पण केले.
नामी- नावात.
धामी- ठिकाणी, घरी.
अखंड – संपूर्ण
चाखायची- आस्वाद घ्यायची.
जनलोक – माणसे.
लोळण घेते – झोपते.
तव – तुझ्या.
भरारणे – संचार करणे.
जे ओठी ते पोटी- जे मनात तेच बोलण्यात.
प्रीत- प्रेम.
साजरा – सुंदर.
गंध – सुवास.
मज – मला.
विसावा – निवारा, विश्रांती.
निर्भर – गाढ, पूर्ण.
अंगाई- बाळाला झोपवण्यासाठी म्हटलेले गीत.
वास – सहवास, रहिवास.

Leave a Reply