वल्हवा रं वल्हवा | 5वी, मराठी कविता
वल्हवा रं वल्हवा
मराठी कविता , 5वी
वल्हवा रं, वल्हवा रं, वल्हवा रं नाव वल्हवली,
वल्हवा रं नाव वल्हवली, वल्हवा रं नाव वल्हवली
नौका चाले कशी जलावरी- जलावरी- जलावरी,
आहे सारा भार मुलांवरी-मुलांवरी-मुलांवरी
लहान वीर-महान धीर,
रोखील वादळ वल्हवा रं- वल्हवली ।।1॥
मोकाट पिसाट वारा आला- येऊ दया रं, येऊ दया रं,
डोंगरमापाच्या लाटा आल्या-येऊ दया रं, येऊ दया रं,
छाती अफाट-झेलेल लाट,
रोखील वादळ वल्हवा रं-वल्हवली ॥2॥
झेंडा माथ्यावर तीन रंगी-तीन रंगी, तीन रंगी
संचारवी जोम नव अंगी नव अंगी, नव अंगी,
डोले कसा-बोले कसा,
धैर्यानं नाव तुम्ही वल्हवा रं-वल्हवली ॥3॥
स्वातंत्र्य दौलत मोलाची रे-मोलाची रे-मोलाची रे,
सर्वांच्या जीवाच्या तोलाची रे-तोलाची रे-तोलाची रे,
ती एक आस-तो एक ध्यास,
जोसानं नाव आता वल्हवा रं-वल्हवली ॥4॥
अर्थ-
तुमची होडी वल्हवा, पुढे न्या- हो हो होडी आम्ही वल्हवली पाहा, आमची होडी कशी पाण्यावर चालतेय !
ही होडी चालवण्याची जवाबदारी मुलांवर आहे.
आम्ही लहान वीर आहोत पण आमचे धैर्य मोठे आहे !
आमची शक्ती वादळाला पण रोखील अशी आहे.
होडी एकजुटीने वल्हवा रे! आम्ही वल्हवली !
पाहा, चहुबाजूंनी मोकाट सुटलेला पिसाट वारा आला- येऊ दया ! डोंगराएवढ्या लाटा उसळत आल्या- येऊ दया !
आमची छाती या लाटा झेलायला समर्थ आहे.
आमची एकजूट या वादळाला रोखून धरील.
होडी वल्हवा रे- आम्ही वल्हवली !
आमच्या माथ्यावर आमचा तिरंगा फडकत आहे.
तो आमच्या अंगात नवीनच जोम निर्माण करत आहे.
बघा कसा डोलत आहे. जणू काही आम्हांला सांगत आहे की, “तुम्ही हिमतीने तुमची होडी वल्हवा रे.” आम्ही वल्हवली.
देशाचे स्वातंत्र्य ही आमची खूप मोलाची दौलत आहे.
ते आम्हां सगळ्यांना जिवाइतकेच महत्त्वाचे वाटते.
तीच आमची इच्छा आहे. तोच आमचा ध्यास आहे.
आता मोठ्या आवेशाने होडी वल्हवा रे. आम्ही वल्हवली.
अधिक माहिती मिळवण्यासाठी ….
जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
सामान्यज्ञान – येथे क्लिक करा
5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा